मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून उत्कंठा असलेली प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत अखेर प्रदर्शित झाली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपा, सुशांत राजपूत, कंगना राणौत यासारख्या विविध मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य केले आहे. यात राऊतांनी मुस्लिमांचे राजकारण करणाऱ्या औवेसींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
सामना अग्रलेखात एकेकाळी मुस्लिमांचा मतांचा अधिकार काढून घ्यावं असं विधान आलं होतं, त्यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, मुसलमान हे देशाचे नागरिक आहेत, त्यांना देशात राहण्याचा संपूर्ण हक्क आहे. परंतु काही पक्ष मुसलमानांचे राजकारण करतात, ते मुस्लिमांना अंधारात ठेवतात. ज्यादिवशी या मतांचे राजकारण बंद होईल तेव्हा देश पुढे जाईल असं बाळासाहेब म्हणायचे, म्हणून त्यांनी हे विधान म्हटलं होतं, एकदा मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, मग मुस्लिमांवर राजकारण करणारे सगळेच पळून जातील, बाळासाहेब ठाकरेंनी विचारपूर्वक ते विधान केले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच हा पाकिस्तान नाही, हा हिंदुस्तान आहे, या देशात सगळ्यांना समान अधिकार आहे. या देशात मुस्लिम राजकारणाला आमचा विरोध आहे. कोर्टात साक्ष देताना कुराण, भगवतगीतावर शपथ दिली जाते, हे चुकीचं आहे, देशाची घटना आहे संविधानावर शपथ घ्यायला हवी अशी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तीच आमची भूमिका आहे. सामनात काय लिहिलं आहे हे सगळे वाचत असतात, सामनात जे लिहिलं ते लिहिलं..बोललो तर बोललो, ते कधी माघार घेतली नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा येत नाही असं बाळासाहेब म्हणायचे त्यांचेच आम्ही शिष्य आहोत असंही संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना हिंदुत्ववादी पार्टी आहे, सर्वांना सोबत घेऊन आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन पुढे जात आहे, घटनेच्या चौकटीत राहून काम करतोय, या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करतात ते सर्वात जास्त धर्मांध असतात. सेक्युलर ही शिवी आहे. राजकारणात सेक्युलर शब्दाचा चुकीच्या अर्थाने वापर केला गेला, सेक्युलरमुळेच हिंदू आणि मुस्लिम विभाजन झालं, हिंदूंना शिवीगाळ करणं म्हणजे सेक्युलर आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला.
दरम्यान, राजकारण साधुसंताचा खेळ नाही, आम्ही तपस्या करण्यासाठी आलो नाही, राजकारणात तपस्या हवी असते त्यातून यश मिळतं. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा राजकारण का करायचं नाही? असं बाळासाहेबांनी विचारलं होतं, पण आपल्या माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेत जावं लागतं, अन्यथा फक्त आंदोलन करायचं, केसेस घ्यायचं हेच झालं असतं. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. देशात ज्यारितीचं वातावरण त्याकाळी बनलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी आणीबाणीला समर्थन देण्याची भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारण असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हे जनतेचे स्वप्न होतं असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं समर्थन केले.
राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही
भाजपा स्थानिक पक्षांना संपवतोय का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, झारखंड अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाला घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षाचं राजकारण होऊ शकत नाही. तसेच मनसे पक्षाबाबत राऊतांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या देशात कायद्याच्या चौकटीत राहून पक्ष चालवण्याचा अधिकार आहे. मनसेचे एकेकाळी १३ आमदार आले होते असं ते म्हणाले.