मुंबई: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या आघाडीच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले आहे.
काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून शिवसेना इथे वाढतच गेली आहे, संजय राऊत म्हणाले.
भाजपचे लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते
कधीकाळी भाजपदेखील सुरूवातीला इथे जेव्हा लढला होता, तेव्हा १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हे राजकारणात निवडणुकांमध्ये हे असे सुरुवातीच्या काळात होत असते. भाजपचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य लोकाचे डिपॉझिट गेले आहे, म्हणून लढायचे नाही का, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
ठाकरे सरकारचा प्रभाव आहे
गोव्यात शिवसेना रुजते आणि रुजली आहे. महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, शिवसेनेचे काम करत आहेत. आमचे लोक आणि भाजपा विषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. इथे जो गोव्यात भाजप दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचे इथे सरकार आले नाही. मनोहर पर्रिकर होते तेव्हाही. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, भाजपला बहुमत मिळणार नाही. लोक निवडून देणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा. शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाही, होण्याची शक्यता नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला, असे संजय राऊत यांनी सांगितले.