मुंबई: आपले मन भरकटू नये, यासाठी आपण एखादा छंद जोपासतो. मनात वाईट विचार येऊ नयेत. एकाग्रता मिळावी, मनातील गोंधळ दूर व्हावा, यासाठी भरपूर गाणी ऐकतो. गाणी ऐकल्यामुळे मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभते. स्वातंत्रवीर सावरकर यांचे शतजन्म शोधिताना हे गाणे अजूनही रोज १० ते १२ वेळा ऐकतो, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. (sanjay raut says everyday i hear shatajanma shodhitana of veer savarkar for 10 to 12 times in a day)
आताच्या घडीला उस्ताद रशीद खान यांची भरपूर गाणी ऐकतो. नवीन गायकही चांगले आहेत. पण, जुन्या गाण्यांमध्ये जास्त मन रमते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘शतजन्म शोधिताना’ अजूनही रोज १० ते १२ वेळा ऐकतो. सकाळी लावतो, गाडीत ऐकतो, त्यातून मला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. एखादे गाणे २०-२० वेळाही ऐकतो. मनाचे समाधान होईपर्यंत गाणी ऐकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या नव्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...
माझ्याकडे चार ते पाच हार्मोनियम आहे
लहानपणी मला कुणीतरी हार्मोनियम आणून दिली. हळूहळू त्यावरून बोटं फिरवत गेलो. त्यातून सूर निघतात. मग एखाद्या गाण्याला ते जोडत बसायचे. एखाद्या गाणे वाजवण्याचा प्रयत्न करायचा. यातून आनंद मिळतो. पेटीवादनाचा छंद ही माझी अत्यंत खासगी आवड आहे. इथे-तिथे वेळ घालवण्यापेक्षा पेटी काढून बसतो, असे संजय राऊत यांनी मोकळेपणाने सांगितले. तसेच माझ्याकडे चार ते पाच हार्मोनियम आहेत. मजा येते. वाद्य बघायला अधिक मजा येते. किती छान वाद्य आहे. माझ्या मुली किंवा कुटुंबातील अन्य कुणीही त्याला हात लावत नाही. पेटी काढून केवळ १० मिनिटे बसलो, तरी सर्वकाही विसरून जायला होते, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरेही हार्मोनियम वाजवायचे
बाळासाहेब ठाकरे पूर्वी हार्मोनियम वाजवायचे. मला माहिती आहे, अशी आठवण सांगत असताना, अतुल कुलकर्णी यांनी बाळासाहेबांचे राजकीय वाजवणेच सर्वांना जास्त माहिती आहे, असे म्हटले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे राजकीय चांगले वाजवतात, त्यांना संगीताचा उत्तम कान असतो, जाण असते. संगीत चांगल्या पद्धतीने समजते. ते सगळं वाजवू शकतात, अशी मिश्किल टिपण्णी संजय राऊत यांनी केली.