मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे, यातच या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचीही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं, यात तपास अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली, या संपूर्ण प्रकरणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली.
सुरुवातीला सचिन वाझे यांची ठामपणे पाठराखण करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता यू टर्न घेतल्यानं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टोला लगावला आहे. याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करून म्हटलंय की, सचिन वाझे याला पोलीस दलात पुन्हा घेण्यावरून मी सांगितलं होतं अडचणी येतील, परंतु कालपर्यंत वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं संजय राऊत म्हणत होते, मग कोणत्या नेत्याच्या खांद्यावरून वाझे पुन्हा पोलीस सेवेत आले, NIA ने याबाबत राऊत यांच्यासारख्या बकबक करणाऱ्यांना उचलून वाझेंवर वरदहस्त असणाऱ्या नेत्यापर्यंत पोहचले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल असं संजय राऊत म्हणाले होते.
सचिन वाझे प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन काय? NIA च्या चौकशीत समोर आला खुलासा
सचिन वाझे प्रकरणात NIA ची सर्च मोहिम
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले. त्यामध्ये दोन सीपीयू, दोन हार्डडिस्क, एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आणि आणि अन्य साहित्य सापडले. नदीत टाकण्यापूर्वी वाझेने ते जाड वस्तूने ठोकून खराब केले होते. त्यामुळे त्यातील डाटा परत मिळविणे अडचणीचे ठरेल. त्यासाठी तो तातडीने फोरेन्सिक लॅबकडे पाठविला जाणार असल्याचे समजते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मिठी नदीच्या वांद्रे येथील पात्राकडे पथक वाझेला सोबत घेऊन गेले. एनआयएचे एसपी विक्रम खलोट यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन तास पाण्यात शोध घेण्यात आला.