मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल आणि बिहारमधील एक्झिट पोलमधून मिळत असलेल्या सत्तांतराच्या संकेतांवरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. भारताने नमस्ते ट्रम्प म्हटले असले तरी सुज्ञ अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना बाय बाय करून आपली चूक सुधारली आहे. तर बिहारमध्येही पुन्हा जंगलराज येईल ही भीती झुगारत आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू, असे स्पष्ट सांगितले. अमेरिका आणि बिहारमधील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जनता हीच श्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान आहे. जो बायडेन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष हा अन्याय, असत्य आणि ढोंगशाहीविरुद्धचा होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असे सामनाच्या आजच्या अग्रलेखलात म्हटले आहेअमेरिकेत सत्तांतर झालेच आहे. बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम जनतेलाच करायचे आसते. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. मात्र त्यांच्या माकडचेष्टा आणि थापेबाजीस जनता भुलली. मात्र ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात सामनाने अमेरिकन जनतेने दिलेल्या कौलाचे कौतुक केले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती आणि भारतातील भाजपा पुढारी आणि राज्यकर्ते नमस्ते ट्रम्पसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत होते. ट्रम्प यांना ऐन कोरोनाकाळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला. त्यातून कोरोनाचा संसर्ग पसरला हे नाकारता येत नाही. मात्र आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण सोपवले ते कायमचेच. ट्रम्प यांनी जनतेने दिलेला कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे ते भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या. हे विसरता येत नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहण्याची आपली संस्कृती नाही. मात्र तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे. इतकेच आता म्हणता येईल, असा टोला सामानामधून मोदी आणि भाजपाला लगावण्यात आला आहे.आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. कमला हॅरिस यांची वैयक्तिक पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. अशा ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे पाठीराखे पंतप्रधान मोदी आणि भाजपावाले होते. आता कमला हॅरिस यांच्या विजयाचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे, असा चिमटाही सामनामधील अग्रलेखातून काढण्यात आला.