अध्यक्षांच्या दालनात झालेली धक्काबुक्की, शिवीगाळवरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. या विरोधात भाजपाने प्रतिविधानसभा भरविली आहे. तेथे स्पीकरवर भाषणबाजी केली जात आहे. गोपनिय कागद वाटले जात आहेत. माजी आमदार पुरोहीत देखील ते वाटत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी बाहेर वाटत असलेली कागदपत्रे, माईक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Bhaskar Jadhav demand action on Prati vidhan sabha of BJP.)
कोरोनामुळे आमदारांना फक्त पीएला घेऊन येण्याची परवानगी आहे. माजी आमदार कसे फिरू शकतात, असा सवाल त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना दिलेली कागदपत्रे त्यांचे आमदार वाटत आहेत. त्यांना विचारले असता ते अध्यक्षांची परवानगी घेऊनच वाटत असल्याचे सांगितले. परवानगी दाखव म्हटल्यावर ते दाखवू शकले नाहीत. ही कागदपत्रे, स्पीकर जप्त करण्याची मागणी करतानाच या कृत्यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली.
यानंतर नवाब मलिक यांनी कालच्या प्रकरणानंतर भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून काही लोक धमक्या देत आहेत. त्यांच्या जिवाला बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल करत अशा लोकांवरही कारवाई करण्याची मागणी मलिकांनी केली. यानंतर अजित पवार यांनी आपणही विरोधात होतो. तेव्हा असाच चुकून स्पीकर आणला होता. तो जप्त करण्यात आला होता. यामुळे या भाजपाच्या कृत्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
पृथ्वीराज चव्हाणांनी जोवर त्या प्रतिविधानसभेवर कारवाई होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची मागणीक केली. तसेच अन्य एका आमदारांनी सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्याचेच निलंबन करण्याची मागणी केली आहे.
यावर अध्यक्षांनी भाजपाच्या प्रतिविधानसभेतील माईक काढून घेण्याचे आदेश दिले. याचबरोबर माध्यमांना लाईव्ह करण्यापासून रोखण्यात आले आहे.