महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य?; काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारमध्ये नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:57 AM2020-07-24T11:57:27+5:302020-07-24T12:02:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.
मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा नाराजीचं सावट पसरलं आहे, अलीकडेच काँग्रेसचे मंत्री राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या चर्चेनंतर ही नाराजी दूर झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र अद्यापही काही मुद्द्यावरुन काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचं समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांमधून येत आहेत. ठाकरे सरकारमध्ये निर्णय घेण्यावरुन ही नाराजी असल्याचं कळतंय, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाने एकत्र मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला डावललं जातंय का असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांना खुद्द चव्हाणांना विचारात न घेता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरु आहेत त्यामुळे ते नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नाराजी बोलून दाखवली आहे. विभागातील काही अधिकारी परस्पर प्रस्ताव पुढे देत असल्याने अशोक चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला अपेक्षित सचिव न दिल्यानेही चव्हाण नाराज होते आता अधिकारी मंत्र्यांना विचारत न घेता प्रस्ताव पुढे ढकलत असल्यानं चव्हाणही कमालीचे संतापले आहेत.
अशोक चव्हाणांच्या नाराजीचं कारण काय?
मंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपक्रम विभागास नवीन वेगळा सचिव आणि इतर अधिकारी वर्ग द्यावा अशी मागणी केली आहे. सध्या या दोन्ही विभागासाठी एक सचिव कार्यरत आहे. वेगळा सचिव देण्यास हरकत नाही पण विभागातील सर्व कर्मचारी वर्ग वेगळे करण्यास मंत्री अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यानंतर थोरातांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही असं स्पष्ट केले. त्यानंतर महाजॉब्स पोर्टलच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही योजना महाविकास आघाडीची आहे की राष्ट्रवादी-शिवसेनेची आहे? असा सवाल उपस्थित केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होताना तिन्ही पक्षांना समसमान वाटप करण्यात येईल असं सांगितले असताना तसं होताना दिसत नाही अशी थेट नाराजी व्यक्त केली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा? केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी
...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं
मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'
केंद्र सरकारनं ‘या’ कायद्यात केली दुरुस्ती; चिनी कंपन्यांना मोठा धक्का