मुंबई : आधी दहा वर्षात झालेले सर्व घोटाळे काढा आणि मग आम्हाला विचारा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, लाज वाटेल असे आम्ही कधी काही केले नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मांजर डोळे मिटून दूध पिते तसे साठ वर्ष काँग्रेसने देश लुटला. आदर्श, कोळसा, आयपीएल, कॉमनवेल्थपासून अगदी शेण घोटाळाही काँग्रेसवाल्यांनी केला. काँग्रेसचा हा घोटाळेबाज कारभार जनता विसरलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.गोरेगाव येथे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारसभेत उद्धव यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. होर्डिंग लावणाºया आधी आरशात पाहावे. साठ वर्षे सत्तेत राहिलेले आणि माजलेले नेते या पाच वर्षात सुधारतील असे वाटत नाही. सर्व घोटाळ्यांसाठी आधी शरद पवार आणि राहुल गांधी यांची चौकशी व्हायला हवी, असे ठाकरे म्हणाले.शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे वेध लागले आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आधी क्रिकेटपटूंसोबत फोटो असायचे आता शेतकºयांसोेबत दिसतात. देशातील शेतकरी दुष्काळग्रस्त आहेत, याचा पवारांना आता साक्षात्कार झालाय. यांचे सरकार होते तेव्हा या लोकांनी घोटाळा करायला शेणही सोडले नाही, अशी टीका उद्धव यांनी केली.पंतप्रधानपदाची खुर्ची ही काही संगीत खुर्चीचा खेळ नाही. राहुल गांधी आता गरीबी हटावचा नारा देत आहेत. जे त्यांच्या आजीला जमले नाही ते यांना जमणार आहे का, असा सवालही उद्धव यांनी केला. एकट्या नेहरूंमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सावरकर बंधुंनी देशासाठी जिवंतपणी मरण यातना भोगल्या. त्या लोकांनी हे सगळ भोगले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. राहुल गांधी त्याच सावरकरांना डरपोक म्हणतोय. स्वातंत्र्य सैनिकांना डरपोक म्हणून हिणवण्याचा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला, अशा नेत्याच्या हातात तुम्ही देश देणार का, असा सवालही उद्धव यांनी केला.>‘... तर दाऊदला फासावर चढवू’मुंबईत बॉम्बस्फोट घडविणारा दाऊद मुंबईत आला तर त्याला फासावर लटकवायचे काम आपले सरकार करेल. पण, काँग्रेस देशद्रोहाचा खटला चालविणार नाही. ते कलमच त्यांना काढायचे आहे. भारतमातेशी द्रोह करणाºयांवर खटला चालणार नाही, असे बोलणाºया नेत्यांच्या हातात तुम्ही देश देणार आहात का, असा सवालही उद्धव यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना राहुल गांधी यांनी लाथ मारली नसती तर मुंबई काँग्रेस फुटली असती. खरे-खोटे देवरांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.
लाज काढणाऱ्यांनी आधी आरशात पाहावे - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:11 AM