पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 05:32 PM2020-06-22T17:32:27+5:302020-06-22T17:34:41+5:30
शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे,
नवी दिल्ली – गुजरातमधील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला आहे. वाघेला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवून दिला आहे. शंकरसिंह वाघेला यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महासचिव प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.
शंकरसिंह वाघेला यांनी हे पत्र ट्विटरवर पोस्ट करुन सार्वजनिकरित्या राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केले आहे. सध्याच्या राजकीय हालचाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, नेते, तालुका-जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकारी यांचा असंतुष्टता हे आपल्या राजीनाम्याचं कारण असल्याचं सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समोर आलं होतं. गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पटेल उर्फ बोस्की यांच्या नियुक्तीवरुन ते पक्षावर नाराज होते.
शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, माझ्या कार्यकाळात गुजरातच्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाढवण्यात आणि मजबूत करण्याचं काम मी केले. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्यामुळे पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
Shankersinh Vaghela tenders his resignation from the post of national general secretary of Nationalist Congress Party (NCP) as well as active membership of the party. pic.twitter.com/9hWt0XBq77
— ANI (@ANI) June 22, 2020
कोण आहेत शंकरसिंह वाघेला?
जनसंघासोबत शंकरसिंह वाघेला यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर जनता पार्टीत ते होते. जनता पार्टी फुटल्यानंतर भारतीय जनता पार्टीत ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख झाली. १९९६ मध्ये त्यांनी भाजपाशी फारकत घेत राष्ट्रीय जनता पार्टी स्थापन केली. याच काळात १९९६-९७ मध्ये ते गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर होते. त्यानंतर राष्ट्रीय जनता पार्टी काँग्रेसमध्ये विलीन केली. युपीए सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्रीही होते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जनविकल्प मोर्चा नावाने पुन्हा नवीन पक्ष बनवला. या पार्टीने गुजरातमध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाग घेतला पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, त्यानंतर २०१९ मध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा हातात घेतला.