पद्मविभूषण शरदचंद्र पवार हे गेली ५० वर्षे या राज्याच्या राजकारणावर, या राज्याच्या मातीवर, या राज्याच्या प्रत्येक घडामाेडीवर गारुड करणारे व्यक्तिमत्त्व आहे. अर्थकारण असाे, समाजकारण असाे, शिक्षण असाे, राेजगार असाे, शेती आणि त्यासंबंधित इतर गाेष्टी असाे, आदरणीय साहेबांनी या आणि अशा प्रत्येक गाेष्टीत इतके काम करून ठेवले आहे की, येणारी १०० वर्षे तरी या माणसाच्या नावाशिवाय, उल्लेखाशिवाय खचितच ते पूर्णत्वास जाईल.वयाच्या १६ व्या वर्षी पवार यांनी सामाजिक तथा राजकीय जीवनाची सुरुवात केली. गाेवा मुक्ती लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा एक मेळावा आयाेजित केला हाेता. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. याच विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले हाेते. पुढे याच यशवंतरावांचे पवार साहेब अत्यंत आवडते शिष्य बनले. पुढे चालून वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा हा दमदार युवक महाराष्ट्र राज्य युवक संघटनेचा अध्यक्ष झाला. आणि इथूनच पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचा वारसदार म्हणून पाहू जाऊ लागले.परंतु, शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात गाजायला लागले ते १९७७/७८ पासून, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काॅंग्रेसमध्ये बंड घडवून आणत वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत त्यांनी जनता दलाच्या मदतीने पुलाेदचे सरकार स्थापन केले आणि राज्यात व देशात हाहाकार उडाला. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्यांनी ही किमया साधली आणि तत्कालीन सर्वशक्तिमान नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही पवार यांनी आपली दखल घेण्यास भाग पाडले.या घटनेनंतर पवार आणि महाराष्ट्राचे राजकारण कधीच वेगळं हाेऊ शकले नाही. वयाच्या १६ व्या वर्षी १९५६ साली एका विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून सुरू झालेला पवार यांचा हा प्रवास पुढे २४ वर्षे महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष, १९६७ साली २७ व्या वर्षी आमदार, २९ व्या वर्षी राज्यमंत्री तर देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवत अवध्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री असा हाेत पुढे विराेधी पक्षनेते (विधानसभा आणि लाेकसभा), खासदार, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री असा विविध मार्गाने समर्थपणे सुरू राहिला आणि या प्रवासात पवार यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांनी या राज्यावर आणि देशावर एकूणच दूरगामी परिणाम केेले आहेत. संपूर्ण देशात फलाेत्पादन क्रांती घडवून आणण्याचा विक्रमही पवार यांच्या नावावरच आहे. राज्यात केलेला फलाेत्पादनाचा प्रयाेग इतक्या माेठ्या प्रमाणावर यशस्वी झाला की, पुढे या प्रयाेगाला ‘राष्ट्रीय फलाेत्पादन अभियान’ म्हणून अवघ्या देशाने स्वीकारले. त्यातून साहेबांनी रोजगार हमी याेजनाही गावाेगावी पसरवली. परिणामी, काेरडवाहू, नापीक जमिनीला नवसंजीवनी प्राप्त झाली. लाखाे उपेक्षित शेतकरी मुख्य प्रवाहात आले. महाराष्ट्रात फलाेद्यान याेजना राबवून ताेपर्यंत अप्राप्य असलेली डाळिंब आदी फळे त्यांच्यामुळेच माेठ्या प्रमाणात बाजारात आली. महाराष्ट्रातील अहमदाबादी बाेरे सर्वत्र दिसू लागली ती त्यांच्यामुळेच. इतकेच नव्हेतर, देशात शेवगा लावू नये, या अंधश्रद्धेला न जुमानता त्यांनी शेवग्याची लावगड केली हाेती. वाइन निर्मितीला प्राेत्साहन देऊन शेतकऱ्याच्या हातात चार अधिकचे पैसे कसे येतील याकडे त्यांनी लक्ष दिले हाेते. साखर मुबलक असताना निर्यातबंदीसाठीचे व्यापारी लाॅबीचे प्रयत्न, काॅमर्स मिनिस्ट्रीशी एकहाती टक्कर घेत पवार यांनीच हाणून पाडले हाेते. कांद्याच्या भावात स्थिरता येण्यासाठी त्याचबराेबर शेतकऱ्यालाही रास्त भाव मिळावा यासाठी अनेक अंगांनी प्रयत्न करणारेदेखील पवारच हाेते.महाराष्ट्राच्या औद्याेगिक विकासाचा पायाही पवार यांनीच रचला, असे म्हणण्यास हरकत नाही. १९८८ साली त्यांनी राेजगार निर्मितीसाठी अनेक धाेरणात्मक निर्णय घेतले. छाेट्या तसेच लघुउद्याेगांना सवलती दिल्या. नंतर दाेन वर्षांत राज्यात ३२०० नवे उद्याेग व हजारावर मध्यम उद्याेग नाेंदवले गेले. हा विक्रम आहे. आदिवासी बांधवांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रथमच आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. परिणामी, राज्यातील सर्वांत उपेक्षित घटकाला राज्याच्या एकूण अर्थसंकल्पात हक्काचा वाटा मिळाला. पुढे सबंध देशाने या निर्णयाला मार्गदर्शक सूत्र म्हणून स्वीकारले.१९९३ चे बाॅम्बस्फाेट असाे किंवा किल्लारीचा विनाशकारी भूकंप असाे. आपत्ती व्यवस्थापन करण्यात असणारी पवार यांची हातोटी सबंध देशाने पाहिली आहे. महिलांना सैन्यात सामावून घेणारेदेखील पवारच हाेते. संरक्षणमंत्री असताना त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतला हाेता. यासाेबतच महिलांना नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये ३३ टक्के आरक्षणाची तरतूद केली. यामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत भाग घेता येऊ लागला. त्यांची ही सगळी कामे पाहिली की, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या कृषी, अर्थ, सामाजिक, शैक्षणिक व राजकारणातील याेगदान पाहता त्यांच्या संपूर्ण कार्याचे अगदी व्यवस्थित आणि टापटीप असे डाॅक्युमेंटेशन व्हायला हवे, असे मनापासून वाटते. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गाेष्टी आता माेठ्या प्रमाणावर हाेतील असे वाटते. असामान्य कर्तृत्वराज्याला गरज असताना ८० वर्षांच्या याेद्ध्याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर, आपल्या अनुभवाच्या जाेरावर आपला जख्ख म्हाताऱ्या हाताने मायेचा हात फिरवत महाराष्ट्राला भाजपच्या जाेखडातून मुक्त केले. गेली ५० वर्षे राज्याच्या राजकारणात एक सुसंस्कृतपणा जपत ते या देशाच्या राजकीय पटलावर ठामपणे आणि खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या या पाॅवर करिश्मा म्हणूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र पाहायला मिळताे. आता हा सह्याद्री ८० वर्षांचा हाेताेय. त्यांना उत्तम आराेग्य लाभाे या अपेक्षेसहित वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शरद पवार : 80 वर्षांचा सह्याद्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 6:07 PM