मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री तसेच कृषिमंत्री अशी विविध पदे सांभाळली आहेत. त्यांच्या या योगदानासाठी पद्मविभूषणसह विविध सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार यांचा आता एका अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे.
निसर्गसौंदर्यासह विविध दुर्मीळ वनस्पती, प्राणी अशा जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कोल्हापूरमधील दोन संशोधकांनी एक नवी वनस्पती शोधली आहे. या वनस्पतीला या संशोधकांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव दिले आहे. त्यामुळे ही वनस्पती आता अर्जेरिया शरदचंद्रजी यांच्या नावाने ओळखली जाणार आहे.
कोल्हापूरमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि त्यांचे सहकारी संशोधक डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्रीमध्ये ही वनस्पती शोधली आहे. ही वनस्पती गारवेल कुळातील आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वनस्पतीच्या शोधाची माहिती कालिकत विद्यापीठामधून प्रकाशित होणाऱ्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथामधून प्रकाशित करण्यात आली आहे. .