- डॉ. जब्बार पटेल(ज्येष्ठ दिग्दर्शक) गेल्या पन्नास वर्षांपासून कला, साहित्य, संगीत या विषयांचा उत्तम व्यासंग असलेले शरद पवार यांना मी जवळून ओळखत आहे. ‘घाशीराम कोतवाल’ च्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केलेले सहकार्य आजही विसरू शकत नाही. ‘घाशीराम’बंद व्हायला नको अशी त्यांची व शासनाची भूमिका होती. तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते. अनेक राजकारणी आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणार नाही, असे म्हणतात. पण पवार असे नेते आहेत की, ज्या कलाकृतीला कुणीतरी अडवतंय, विरोध करतंय हे कळल्यानंतर स्वत:च नाटकाच्या प्रयोगावेळी पहिल्या रांगेत जाऊन बसत. ‘घाशीराम’ च्यावेळी याची प्रचीती आली. या नाटकाला प्रे़क्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नाटकाचे प्रयोग कुणीच थांबवू शकले नाहीत. युरोपला हे नाटक जातानाही त्यांचे भरीव सहकार्य लाभले. खरे तर त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. पण नाटकाविषयी विरोधी वातावरण असतानाही कलाकार सुखरूपपणे उड्डाण घेतील इतके त्यांनी लक्ष घातले. कलेची जाण असणारा असा नेता विरळाच! व्यावसायिकपेक्षाही प्रायोगिक, मग ती ‘घाशीराम’, तीन पैशांचा तमाशा’, ‘महानिर्वाण’ ही नाटके असोत, कुणी नवीन प्रयोग करणार असेल तर ते आवर्जून तीन ते चार तास काढून ते नाटक बघायला जाणारच. इतके त्यांचे नाटकप्रेम अफाट आहे.सिंहासन’ चित्रपटावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा विजय तेंडुलकर यांनी मला त्यांच्याकडे जायचा सल्ला दिला. राजकारणावर आधारित चित्रपट करतो आहे. काही मदत मिळाली तर? असे त्यांना म्हटल्यावर त्यांनी मंत्रालयात परवानगी देण्याबरोबरच मंत्र्यांचे बंगलेही चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले.कला, साहित्य या विषयाबाबत त्यांची असलेली जाण यामागे त्यांची फार मोठी सामाजिक, राजकीय दृष्टी आहे. त्यात मानवतेचाही अंश आहे. संविधानाने दिलेली शक्ती पणाला लावली तरच लोकशाही टिकते, असे ठाम मत असलेले जे नेते आहेत, जसे मनुष्याला जगण्याचे, श्वास घेण्याचे अधिकार आहेत तसेच ते आविष्कारांचे आहेत. त्यामुळे कोणाचाही आविष्कार कुणामुळेही थांबता कामा नये, अशीच त्यांची भूमिका असते. प्रत्येक धर्म, त्याच्या शाखा कशा नांदतात, याची एक चिंतनात्मक बैठक त्यांच्याकडे आहे. हा व्यासंग त्यांना वाचनातून व घरातील संस्कारातूनही मिळाला.मनमोकळेपणे संवाद साधणे आणि इतरांच्या अभिव्यक्तीचा आदर राखणे, त्यांना स्वातंत्र्य देणे हे त्यांनी कायमच जपण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट राजकीय टप्प्यावर लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. साहित्यिकांसह विविध पक्षांतील मित्र जोडणे आणि स्वभावातील उमदेपणा हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा विभिन्न पैलू होता. तोच पैलू पवार यांच्यामध्ये अधिक पटीने अनुभवास मिळतो. स्वत:चे व्यक्तिमत्त्व त्यांनी त्या पद्धतीने जपले. लोकशाही मूल्य जपणाऱ्या कोणत्याही गोष्टी मग त्या साहित्य, कला किंवा जगण्यातल्या असो त्यामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. राजकीय क्षेत्रात असूनही सुसंस्कृत असणे खूप दुर्मीळ आहे. त्यांना सदृढ आरोग्य लाभो, भविष्यात देशासाठी अत्यंत भरीव कामगिरी त्यांच्या हातून घडो. हीच मनापासून सदिच्छा.उमदा स्वभाव एका विशिष्ट राजकीय टप्प्यावर लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. साहित्यिकांसह विविध पक्षांतील मित्र जोडणे आणि स्वभावातील उमदेपणा हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा विभिन्न पैलू होता. तोच पैलू पवार यांच्यामध्ये अधिक पटीने अनुभवास मिळतो.
शरद पवार : लोकशाहीची मूल्ये जपणारा सुसंस्कृत नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:24 PM