"साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि...", शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:35 PM2024-10-29T14:35:15+5:302024-10-29T14:37:27+5:30
Ajit pawar Sharad Pawar News : अजित पवारांनी कान्हेरीतील प्रचार सभेत बोलताना शरद पवारांवर नाव न घेता कुटुंब फोडल्याचा आरोप केला. अजित पवारांच्या या विधानावर शरद पवारांनी आज भाष्य केले.
Ajit pawar Sharad pawar Latest News : 'आई सांगतेय की, माझ्या दादाच्याविरोधात फॉर्म भरू नका", असं सांगतानाच अजित पवार भावूक झाले. त्यानंतर 'साहेबांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का?', असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या या विधानाला उत्तर देत शरद पवारांनी त्यांची नक्कल करत खिल्ली उडवली. सहा महिन्यांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं काय आहेत? असा सवाल शरद पवारांनी केला.
ज्या कान्हेरीत अजित पवारांनी २८ ऑक्टोबर रोजी सभा घेतली. त्याच ठिकाणी आज (२९ ऑक्टोबर) युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले. तसेच सहा महिन्यांपूर्वीच्या भाषणांची आठवण अजित पवारांना करून दिली. शरद पवारांनी अजित पवारांची नक्कलही केली.
अजित पवारांची नक्कल, शरद पवार काय म्हणाले?
युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, "काल भाषणात सांगण्यात आलं की, घर फोडलं. घरं फोडण्याचं पाप माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावांनी मला कधी शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे, अनंतरावांसह माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घरचा संसार बघितला नाही. शेती बघितली नाही. सगळी यांनी बघितली. मी आपलं गावभर हिंडत बसलो. राजकारण करत बसलो. देशाच्या पातळीवर करत बसलो. का, या सगळ्या भावांचे आशीर्वाद आणि आधार मागे होता म्हणून मी हे करू शकलो", असे उत्तर शरद पवारांनी अजित पवारांना दिले.
"माझ्याकडून कधी अंतर येणार नाही"
शरद पवार पुढे म्हणाले, "त्यावेळचे भाऊ आणि त्यांची मुलं बाळं यांच्यात माझ्यापासून कधी अंतर येणार नाही, ही माझी भूमिका आहे. ती राहील. तुम्ही कशी मत घेतली, कशी भूमिका घेतली. तर त्यामध्ये माझ्याकडून कुठेल्याही प्रकारची ही भूमिका होणार नाही."
अजित पवारांची शरद पवारांनी केली नक्कल
शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "एकच गोष्ट सांगतो. भाषणं मी बघितली. दोन प्रकारची भाषणं. सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळी भाषणं काय होती, नेत्यांची (अजित पवार)? भाषणं होती की, साहेब येतील. भावनाप्रधान होतील. भावनेला हात घालतील. भावनाप्रधान तुम्ही होऊ नका. साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील. आणि मत द्या म्हणून सांगतील. तुम्ही भावनाप्रधान होऊ नका. चांगलंय माझ्यासाठी सल्ला दिला. आजच्या वर्तमानपत्रात वाचलं का, कालच्या सभेमध्ये", असे म्हणत शरद पवारांनी रुमाल घेतला आणि डोळे पुसत अजित पवारांची नक्कल केली.
शरद पवार पुढे म्हणाले, "हा प्रश्न भावनेचा नाहीये. हा प्रश्न तत्वांचा आणि विचारांचा आहे. गांधी, नेहरूंचे तत्वज्ञान आम्ही घेतलेलं आहे. त्या विचाराने मी काम करतो आणि त्या विचाराने काम करणार. विचारधारा गांधी, नेहरू, फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू राजे या सगळ्यांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. त्या विचारधारेने काम करणे ही माझी पद्धत आहे", असे शरद पवार म्हणाले.