Sharad Pawar PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम दौऱ्यावर असताना काँग्रेसला लक्ष्य केले होते. बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर बोलताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाची आम्हाला बदनामी करायची नाही, पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे पवार म्हणाले.
मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मोदींच्या विधानावर बोट, शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान आले आणि बंजारा संबंधीची मते त्यांनी मांडली, पोहरादेवीला. त्यांनी एक विधान असं केलं की, बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने कुठेही त्यांना संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. ३ वर्ष सुधाकरराव नाईक होते. मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात अनेक वर्ष होते", असे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
मोदींनी पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे -शरद पवार
"सगळ्या राज्याचं नेतृत्व करण्याच्या सबंधीची संधी काँग्रेसने बंजारा समाजाला दिली. त्यावर तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचे पंतप्रधान, ते स्वतः येऊन सांगतात की, असं काही घडलेलं नाही. पंतप्रधान ही संस्था आहे, त्याची आम्ही बदनामी करू इच्छित नाही. पण, त्या पदावरील व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जात नाही", अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाला उत्तर दिले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
वाशिममध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसच्या सरकारांनी, काँग्रेसच्या धोरणांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष ज्यांनी ताब्यात घेतला त्यांचा विचार सुरुवातीपासून परदेशी राहिला. त्या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमी अपमानजनक वागणूक ठेवली."