मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांचे चांगलेच कान उपटले. पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी बुधवारी पार्थ पवार यांना फटकारले. यानंतर राजकीय वातावरणात याविषयावर विविध चर्चांना उधाण आले.
दिवसभरातील या चर्चेनंतर रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असे काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही" याचबरोबर, ही बैठक कालच ठरली होती. यात पार्थ पवार संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. इतर महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली. पार्थ पवार यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, तो इनमॅच्युअर (अपरिपक्व) आहे. सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्ष ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले होते.