मुंबई – राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर झालेला सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात गाजला होता, या सत्तेच्या राजकारणात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे, कॅमेरासमोर दिसणाऱ्या घडामोडी आणि पडद्यामागून सुरु असणाऱ्या हालचाली याबाबत केवळ त्यात प्रामुख्याने सहभागी झालेले नेतेच उलगडा करु शकतात, यात प्रमुख नेते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, अनेक वर्षाचे मित्र शत्रू बनले तर शत्रूच्या गोटात सहभागी होऊन मित्राला धडा शिकवला. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले. याबाबत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला खरी बाजू असते. मुख्यमंत्रिपदाचं शिवसेनेला वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे सांगतात, पण मला कधीच वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले नाही, ५० टक्के जागा वाटप हे ठरलं होतं, त्यानुसार पत्रकार परिषदेत घोषणा झाली, अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता असं त्यांनी मला सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं असं त्यांनी सांगितले.
तसेच आज अनेकजण पुस्तक लिहित आहे पण त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार आहे, माझ्याकडे सगळा घटनाक्रम डोक्यात आहे, ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येणार नाही असं लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडे काय पर्याय आहे असा विचार केला त्यावेळी आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत, त्या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या, एका बैठकीत मी होतो, एका बैठकीत नव्हतो, सगळ्या चर्चा मला माहिती आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आम्ही कॉर्नर झलो.. दोन-तीन दिवस शांत बसलो, कुठलीच कृती केली नाही, पण दोन-तीन दिवसांनी अजितदादांकडून आम्हाला पर्याय आला, शरद पवार जे आधी म्हणाले, स्थिर सरकार भाजपा-राष्ट्रवादीच देऊ शकते, तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे सांगत त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी द इनसाइडर या मुलाखतीदरम्यान केला.
दरम्यान, ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतोय, प्रत्येकजण खंजीर खुपसतोय तेव्हा जगावं लागतं तेव्हा यू हॅव टू बाउन्स बँक. गनिमी कावा करावा लागतो. मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो.रात्री ठरलं सकाळी केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याविरोधात गेला नसता तर आमचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं, आज मागे वळून पाहता तेव्हा तो निर्णय चुकला होता असं वाटतं पण त्याक्षणी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ९९ टक्के यशस्वी होण्यापर्यंत पोहोचून अयशस्वी झालो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.