उस्मानाबाद - गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. इतकचं नाही तर खडसेंनी २ दिवसांपूर्वी भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येऊ लागल्या आहेत, खुद्द एकनाथ खडसेंनी यावर मौन बाळगलं असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खासदार शरद पवारांनी संकेत दिले आहेत, पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं त्यांनी सांगितलं आहे. पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत शरद पवारांनी गेलेत तिथे सुखी राहा असा संदेश दिला आहे.
रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजपातच राहतील याचा मला विश्वास आहे. पक्षाकडून कोणत्याही सदस्याने राजीनामा दिला नाही, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मला कोणत्याही नेत्याचा राजीनामा मिळाला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना यांना पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केला. त्यामुळे, पत्रकारांमध्ये हशा पिकला.
खडसे पक्षांतर करणार नाही- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, जामनेर येथील कार्यक्रमाला खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे गैरहजर राहिले तर खासदार सुनबाई व समर्थकांनी मात्र उपस्थिती दिली. खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असंही फडणवीस म्हणाले होते.
ऑडिओ क्लीप व्हायरल
एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून चाचपणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली.