मुंबई - पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भगीरथ भारत भालके हे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत आहेत. आज निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या ब्रिच कँडी रुग्णालयातून व्हर्चुअली पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. खा. सुप्रिया सुळे या एक मुलगी म्हणून रुग्णालयात आपल्या वडिलांची काळजी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजुला नेत्या म्हणून रुग्णालयातूनच आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी सभाही घेत असल्याचे चित्र आज दिसले. ज्याप्रकारे शरद पवार हे ज्याप्रकारे स्वतःला झोकून देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तिच संघर्षमय वृत्ती आज सुप्रिया सुळे यांच्या कृतीतून दिसून आली.
आपल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं. मात्र नाना अर्धवट साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. आपण भालके नानांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे आपण नानांची अर्धवट राहिलेली स्वप्नं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके यांना घड्याळाच्या बाजूचं बटण दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राज्यात सध्या लागू केलेल्या कडक निर्बंधाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी या सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करून शासनाला सहकार्य करूया असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं.