मुंबई : आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लगावला होता. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का?, असा प्रश्न विजय दर्डा यांनी शरद पवार यांना केला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही. त्यांचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळालेत आहेत. 'लोकमत'चा पुरस्कारही मिळाला आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट त्यांचा तिथे आहे."
याचबरोबर, शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपविले पाहिजेत, अशी अनेकदा चर्चा होते. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले," राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे. या सगळ्यातून मान्य असेल असे अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये मी सांगू शकतो. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशा नावांची मालिका मी घेऊ शकतो. आज या पक्षामध्ये असे अनेक लोक नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत."
दरम्यान, गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी आपला निर्णय बदलून शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याचे शरद पवार यांचे स्वप्न आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकले तर आपले हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली. त्यामुळेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला, असे ‘पॉवर ट्रेडिंग’च्या लेखिका प्रियम गांधी यांनी म्हटले आहे.