- प्रतिभाताई पाटील(माजी राष्ट्रपती.) शरदराव हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व झालेले आहे. महाराष्ट्रातील मुत्सद्दी नेते आहेत. २०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणले. असाध्य ते साध्य करून दाखविले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देऊन देशाचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या महाआघाडीचे सरकार आणले.शरदराव यांनी विविध पदांवर राहून केलेली कामगिरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये बनत गेली. आता त्यांची गणना देशाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये होते. त्यांची विचारांची झेप व दूरदृष्टीची चमक आता स्पष्टपणे राष्ट्रव्यापी विचाराने प्रेरित झालेली दिसते.१९६७ पासून आजपर्यंत ते ज्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमधून गेलेत व त्यातून जे वेगवेगळे अनुभव आलेत, त्यातून त्यांचे समृध्द व्यक्तिमत्व घडले. कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग काढून त्या मार्गावर चालताना पडेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी असते. संकटाच्या काळात ते नेहमी खंबीरपणे निर्णय घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना श्री शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकारण ते कधी विसरले नाहीत. त्यांच्या पुरोगामी विचारांचा ठसा त्यांच्या राजकीय जीवनात दिसतो. महाराष्ट्राची नस न् नस पवार बरोबर ओळखतात. त्यांच्या बरोबरीची कुशलता असणारे फार थोडे राजकारणी देशात आहेत. १९७९ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना एकमेकांवर टीका न करता आम्ही संयुक्तपणे महाराष्ट्राचा दौरा केला व लोकांना तातडीने मदत कशी पोहचवता येईल असा प्रयत्न केला. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. आदर कायमशरदराव १९७९ मध्ये मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होते. त्यावेळी त्यांच्यावर भरपूर टीका व हल्ला चढवला. पण त्यांनी कधी कटुता आणू दिली नाही. त्यांच्याबद्दलचा आमचा आदरही कमी झाला नाही.
शरद पवार : असाध्य ते साध्य करणारे कर्मवीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:10 PM