मुंबई - पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या एकहाती विजयामागे शरद पवार यांनी केलेले मतविभाजन टाळण्याचे आवाहन कारणीभूत होते, असे विधान भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केल्यापासून महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयामागे शरद पवार यांचा अदृश्य हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात की, पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यामुळे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जिंकल्या, असं काही जण म्हणतायत. पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनसुद्धा पंढरपूरची एक सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही, असा चिमटा निलेश राणे यांनी काढला.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाजपाला एकहाती धूळ चारल्यानंतर आता देशभरात त्यांच्या या विजयाची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले होते. तसेच भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीच हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व भाजपाविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसला, असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कैलास विजयवर्गी यांच्या या विधानावरुन पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष जितेंद्र आव्हाड यांनी काढला होता.