मुंबई – राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, कधी मित्र असलेला शत्रू बनतो तर शत्रू मित्र बनून साथ देतो, राजकारणात बुद्धीबळाचा डाव खेळण्यासाठी सगळेच तयार असतात, राज्यातील सत्तासंघर्षाला एक वर्ष पूर्ण होत असताना आता या काळात नेमकं काय घडलं? यावर लेखिका प्रियम गांधी यांनी पुस्तक लिहिलं आहे, या पुस्तकातून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं तर तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार आणलं.
राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना साथ देत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र या घटनेमागे अनेक पैलू पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा डाव खेळला, भाजपाला पाठिंबा देण्यासाठी पवारांनी त्यांच्या दोन विश्वासू शिलेदारांना वर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पाठवले आणि राष्ट्रवादी भाजपासोबत येत सरकार बनवण्यासाठी तयार आहे अशी इच्छा सांगितली.
यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत सगळं निश्चित करण्यात आलं, कोणाला कोणतं मंत्रालय मिळणार, मंत्रिमंडळात किती जागा वाट्याला येणार यावर सहमती झाली, या बैठकीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपात यांच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला तेव्हा जनतेला काय सांगायचं हा प्रश्न समोर आला.
तेव्हा शरद पवारांनी सांगितले, आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मदत करू, त्यानंतर पुढील १० दिवस मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतो. माध्यमांना सांगताना, महाराष्ट्रात एका स्थिर सरकारची गरज आहे, त्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर करणार होते. मात्र काही दिवसांनी शरद पवारांचे मन बदलले आणि त्यांनी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. पक्षातील अनेक नेते भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी उत्सुक होते.
त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले, त्यांना शरद पवार आता भाजपासोबत येण्यास तयार नाहीत असं सांगितलं, पण पक्षातील अनेक नेते भाजपासोबत येण्यास तयार असल्याचंही फडणवीसांना सांगितले, त्याचसोबत अजित पवारही भाजपासोबत येण्यास तयार आहेत, त्यासाठी तुम्ही अजित पवारांशी संपर्क ठेवा आणि आपला जो मूळ प्लॅन आहे, त्याच्यावर अंमलबजावणी करा असं त्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
एकाच वेळी शरद पवारांचा दोन दगडांवर पाय
शरद पवार एकीकडे भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी चर्चा करत होते, तर दुसरीकडे ते काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबतही चर्चा करत होते. शरद पवार यांना काँग्रेस आणि शिवसेना जास्त अधिकार देण्यास तयार होते, तर भाजपासोबत गेल्यास शरद पवारांना राज्यात देवेंद्र फडणवीस, केंद्रात अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुळवून घ्यावं लागणार होते. अशातच शरद पवार यांना काँग्रेस-शिवसेनेसोबत गेल्यास जास्त फायदा होईल असं वाटलं.
स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीची बोलणी झाली होती? नवाब मलिकांनी केला खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप फेटाळले
हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपाने ८० तासाचं सरकार बनवलं, त्यावरुन भाजपाची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला.