पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 2014 पासून काँग्रेसच्या (Congress) भल्याभल्या नेत्यांची हवाच काढून टाकली आहे. यामुळे ठिगळे शिवता शिवता पुरती दमछाक झालेल्या काँग्रेसला मोठ्या काळापासून नेतृत्व कोणी करावे या प्रश्नाचे उत्तरच सापडत नाहीय. दुसरीकडे काँग्रेसच्या सोबतीने असणारे वेगवेगळे पक्ष आपला रस्ता शोधू लागले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ निवडणुकीत काँग्रेसने केंद्रात सोबत असलेल्या पक्षांविरोधातच आघाड्या केल्याने कदाचित या निवडणुकीपासूनच काँग्रेस वगळून साऱ्या विरोधकांना एकाच मंचावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही तयारी दुसरे तिसरे कोणी करत नसून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारच (Sharad Pawar) करत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar making third front of local Opposition Parties, Congress may loose Control on Indian Politics.)
शरद पवारांनी कालच याचे संकेत दिले आहेत. गैर भाजपा, गैर काँग्रेसी पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची तयारी पवारांनी सुरु केल्याचे दिसत असल्याने काँग्रेस आता विरोधकांमधूनही बाजुला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवारांनी मंगळवारी सांगितले की, देशात आताच्या घडीला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे. सीताराम येच्युरी यांनीदेखील याला पाठिंबा दिल्याचे पवारांनी सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनेने आधीच विरोधकांची मोट बांधण्याचा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला आहे. आता या आघाडीमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी केरळचे सीपीएमचे महासचिव सीताराम येच्युरी यांनीदेखील रुची दाखविल्याने काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. तिसऱ्या आघाडीबाबत अद्याप रुपरेषा ठरली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.
आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार
केंद्र सरकार म्हणजेच भाजपा मोठ्या ताकदीनिशी पश्चिम बंगाल निवडणुकीत उतरली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याची इच्छा याआधीही अनेकांनी व्यक्त केली होती. बंगालमध्ये पवारांनी काँग्रेस, भाजपाविरोधात ममतांना पाठिंबा दिला आहे. तसेच ममतांचा प्रचार करण्यासाठी सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, झारखंडचे हेमंत सोरेन आदी नेत्यांचा पाठिंबा मिळविला आहे. हे नेते पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करणार आहेत. सध्या युपीएमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी आहे, यामुळे या विरोधकांना एका सक्षम नेतृत्वाची गरज असून ते अनुभवी शरद पवारांच्या रुपाने भरून येण्याची शक्यता आहे. शरद पवार हे असे नेते आहेत ज्यांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मागतात.
2014 पासून प्रयत्न सुरु...2014 पासून वेगळी आघाडी बनविण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य नव्हते. अनेक राज्यांमध्ये या पक्षांचा मुकाबला हा काँग्रेसशी आहे, किंवा काँग्रेसमुळे मतविभाजन होऊन त्याचा फटका बसतो. यामुळे विरोधकांचा चेहरा हा गैर काँग्रेसी असावा अशी मागणी होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेस, बंगालमध्ये तृमणूल-काँग्रेस, केरळमध्ये डावे-काँग्रेस अशी लढाईची परिस्थती आहे.