Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय बॉम्ब फोडला होता. 'लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली', असे ते म्हणाले होते. पण, ही ऑफर देणारा नेता कोण? याबद्दल त्यांनी बोलणे टाळले होते. याच प्रश्नाबद्दल नितीन गडकरींना विचारण्यात आले. (Which leader offered the post of Prime Minister? What did Nitin Gadkari answer?)
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत झाली. यावेळी त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देणारा नेता कोण? याबद्दल विचारण्यात आले.
पंतप्रधान पदाची ऑफर देणारा नेता कोण? नितीन गडकरींनी दिले उत्तर
कोणी तुम्हाला ऑफर दिली होती आणि कोणत्या कारणामुळे तुम्ही ही ऑफर नाकारली? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले, "पहिली गोष्ट अशी आहे की, आताच नाही तर अनेक वेळा, अनेक लोकांनी मला हे म्हटले. माध्यमातही याची चर्चा झाली आहे. मी ही गोष्ट यासाठी सांगितली की, आपल्या देशाची समस्या विचारांतील भिन्नता नाही, तर विचारशून्यता आहे. दिल्लीतील कार्यक्रमात पत्रकारांना मी म्हणालो होतो की, आमचा दृढ निश्चय आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे."
"आणीबाणीनंतर मी राजकारणात आलोय. माझा दृढ निश्चय हा आयुष्यभरासाठीचा आहे, ते म्हणजे विचारधारा. त्याबाबत मी कधीही तडजोड करणार नाही. त्यांनी मला जेव्हा प्रस्ताव दिला. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला मला का पंतप्रधान करायचे आहे? पंतप्रधान होणे ही माझ्या आयुष्यात कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती", असे नितीन गडकरी म्हणाले.
ऑफर केव्हा आणि कुणी दिली?
पंतप्रधान पदाची ऑफर केव्हा दिली गेली आणि कुणी दिली? या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले, "निवडणुकीच्या आधीही भरपूर आल्या होत्या आणि नंतरही आल्या. मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की, मला जेव्हा ऑफर दिली गेली, तर ती स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. त्यामुळे मी म्हणालो की, पंतप्रधान होणे हा माझा उद्देश नाही. विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करणार आहे."
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी कुणी ऑफर दिली? तुमचे सगळीकडे मित्र आहेत, यावर नितीन गडकरी म्हणाले, "मी काही चौकात उभा नाहीये आणि ऑफर कुणी दिली, हे सांगणे नैतिकतेनुसार योग्य नाही. मग तुमच्यात आणि माझ्याबद्दलही... जेव्हा खासगी बोलणी होतात, तेव्हा त्याबद्दल दुसऱ्यांना सांगणे चांगले नाही. मी कोणत्याही नेत्याचे नाव घेणार नाही. तुम्हीही कितीही विचारले तरी मी सांगणार नाही", असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले.