शरद पवारांच्या ‘गुगली’ ने अहमदनगर,सांगली आणि पुणे मतदार संघात उडाला राजकीय धुराळा ..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 11:42 AM2019-03-02T11:42:58+5:302019-03-02T11:47:03+5:30
अहमदनगरची जागा काँग्रेससाठी मुळीच सोडली वगैरे नाही, पक्षाकडे या जागेवर लढण्यासाठी अनेक सक्षम उमेदवार आहे.
पुणे: लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय पक्षांमधील जागांच्या देवाणघेवाणीवरून बराच राजकीय धुरळा उडू लागला आहे. शुक्रवारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील काही जागांच्या देवाणघेवाणीवरून अहमदनगर, सांगली व पुणे या लोकसभा मतदारसंघांमधील राजकीय वर्तुळात अशीच गडबड उडाली, मात्र नंतर त्यात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले.
या गडबडीचे केंद्र अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणात होते. तिथे दुपारी त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसला दिली असल्यासारखे काहीतरी वक्तव्य केले. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र तिथे त्यांच्याकडे सध्या उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपले पुत्र डॉ. सूजय विखे यांच्यासाठी ही जागा मिळावी असा आग्रह धरला आहे. त्यासाठी त्यांनी पवारांनी पवार विखे संघर्ष विसरावा, सुजय त्यांना नातवासारखाच आहे अशी कौटूंबिक आळवणीही केली.
पवार यांच्या वक्तव्याची लगेचच काँग्रेससाठी नगर (दक्षिण) सुटली अशी बातमी झाली. त्याचा संदर्भ पुण्याशी लागला. पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. पवारांना ती हवी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर व पुण्यात देवाणघेवाणीचा सौदा झाला असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यातून काँग्रेसच्या पुण्यातून इच्छुक असलेल्यांचे धाबे दणाणले. त्यांनी फोनवर संपर्क साधण्यास सुरूवात केली. त्यावेळी सांगली लोकसभेसाठीची काँग्रेसची जागा घेऊन राष्ट्रवादीने नगरची जागा देऊ केल्याची चर्चा सुरू झाली होती. सांगलीची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र तेथून लढण्यासाठी काँग्रेसच्या सक्षम नेत्यांनीही नकार दिला आहे. ही जागा आघाडीत असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेला द्यायची म्हणून ही तडजोड झाली असल्याचे सांगण्यात येऊ लागले.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीकडेच असल्याचा खुलासा केला. पवार यांचे वक्तव्य उपरोधिक होते. पक्षाने नगरची जागा काँग्रेससाठी मुळीच सोडली वगैरे नाही, पक्षाकडे या जागेवर लढण्यासाठी अनेक सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या इच्छुकांना निश्वास सोडला. सांगलीमधील गडबडही थांबली. नगरमध्ये मात्र डॉ. विखे यांच्या समर्थकांसमोर पुन्हा आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला.