Bhagyashri Atram Vijay Wadettiwar aheri vidhan sabha 2024 : राष्ट्रवादीतील बंडानंतर साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या अहेरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पण, त्यांच्या उमेदवारीला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाग्यश्री आत्राम पराभूत होतील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवारांनी अहेरीच्या जागेवरही दावा केला आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी बाप विरुद्ध मुलगी अशी लढत बघायला मिळण्याचीच शक्यता जास्त आहे. पण, जागावाटप आणि उमेदवारांच्या घोषणेनंतर त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होईल. असे असले तरी भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, त्यांची उमेदवारी घोषित होण्याआधीच काँग्रेसने विरोध केला आहे.
काँग्रेसचा विरोध का? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "काँग्रेसने ही जागा लढली पाहिजे. कारण, धर्मरावबाबा आणि मुलींमध्ये जर ही निवडणूक झाली, तर मुलीचा पराभव होईल आणि धर्मरावबाबा सहज निवडून येतील. महाविकास आघाडीचं एका जागेचं नुकसान होईल. हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे."
"लोकांमध्ये ही चर्चा आहे की, मुलीला (भाग्यश्री आत्राम) १०-१५ हजार मते पडतील. ती जास्त मते घेणार नाही. धर्मरावबाबांचा मार्ग सुकर करण्यासाठीच मुलीने विरोधात भूमिका घेतली अशी पण चर्चा आहे", असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
अहेरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने केला दावा
ते पुढे बोलताना म्हणाले की, "त्यामुळे आम्ही मित्रपक्षाकडे सांगितले आहे की, एक जागा वाढवण्यासाठी ही जागा काँग्रेसच्या कोट्यात द्या", असे सांगत वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
धर्मरावबाबा आत्राम १५ हजारांच्या मताधिक्याने झाले होते विजयी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांनी १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी भाजपाचे त्यावेळेचे विद्यमान आमदार अंबरीशराव आत्राम यांचा पराभव केला होता. धर्मरावबाबा आत्राम यांना ६०,०१३ मते मिळाली होती, तर अंबरीश आत्राम यांना ४४,५५५ मते मिळाली होती.