पुणे: 'तुमचं जेवढं वय आहे, तेवढी शरद पवारांची राजकीय कारकिर्द आहे', अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. 'राज्यपालांचं वय झालं आणि शरद पवारांचं वय झालं नाही का?', असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. त्यावर चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. 'वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं, म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर लगेचचं चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले. राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत, त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे', असा टोला चाकणकर यांनी लगावला.
चाकणकर पुढे म्हणाल्या की, 'कोथरूड व्हाया आमदार झालेले चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. प्रदेशाध्यक्ष असूनही अमित शाहंनीनी तुम्हाला भेट नाकारली, याचं जरा आत्मचिंतन करा. कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.