पुणे : देशाचे नवे सहकारमंत्री अमित शहा यांची खासदार शरद पवार यांनी नुकतीच दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांना पुण्यातील वसंतदादा साखर संस्था (व्हीएसआय) भेटीचे निमंत्रण पवार यांनी दिले.पवार यांच्यासमवेत या वेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. येत्या महिन्यात शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांनी व्हीएसआय तसेच साखर कारखान्याला भेट द्यावी, अशी विनंती पवार यांनी शहा यांना केली. ती शहा यांनी मान्य केल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.सन १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची सत्ता होती. याच काळात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावाने झाली. यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि तत्कालीन सरकारमधील काही मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, नाईकनवरे यांनी सांगितले की, साखरेच्या किमान विक्री दराच्या वाढीबाबत शहा यांनी पूर्ण सहमती दर्शविली. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून लवकरच योग्य निर्णय करण्याचे आश्वासन शहा यांनी दिले. तसेच इथेनॉल प्रकल्पांच्या कर्जपुरवठ्यासाठी धोरण लवचिक करण्याचे आदेश बँकांना १५ ऑगस्टपूर्वी देण्यात येतील, असेही सांगितले.
अमित शहांच्या पुणे दौऱ्यासाठी शरद पवारांची ‘साखरपेरणी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 11:00 AM