"तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें वैक्सीन...", भाजपाच्या 'त्या' आश्वासनावर काँग्रेस नेत्याचा निशाणा
By ravalnath.patil | Published: October 22, 2020 06:21 PM2020-10-22T18:21:33+5:302020-10-22T18:30:30+5:30
shashi tharoor : गुरुवारी भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला.
नवी दिल्ली : कोरोना संकट काळात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये बिहारमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपाच्या या आश्वासनावर निशाणा साधला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनीही या आश्वासनावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस... काय भयंकर कुटिलपणा! निवडणूक आयोग त्यांना आणि त्यांच्या काठावर लटकणाऱ्या निर्लज्ज सरकारला रोखणार का?" असे ट्विट शशी थरून यांनी केले आहे.
याचबरोबर, भाजपाच्या या आश्वासनावर आरजेडीने सुद्धा निशाणा साधला आहे."कोरोना लस भाजपाची नव्हे तर देशाची आहे! लसीचा राजकीय वापर दिसून येत असून त्यांच्याजवळ आजार आणि मृत्यूची भीती विकण्याशिवाय पर्याय नाही! बिहारी स्वाभिमानी आहेत, काही पैशातआपल्या मुलांचे भविष्य विकत नाहीत!," असे ट्विट आरजेडीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यात ११ मोठे संकल्प करण्यात आले असून सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. यावेळी "भाजपा है तो भरोसा है" असा भाजपाने नवीन नाराही दिला आहे.
भाजपाच्या जाहिरनाम्यातील ११ मुख्य संकल्प
१. बिहारच्या प्रत्येक रहिवाशांना कोरोनाची लस मोफत देणार.
२. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन देणे.
३. एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन शिक्षकांची भरती होईल.
४. पुढील पिढीसाठी आयटी हब येथे पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती.
५. एक कोटी महिला स्वावलंबी बनवणार.
६. आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकर्या मिळतील तसेच २०२४ पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार.
७. धान आणि गहू नंतर डाळींची खरेदीही एमएसपी दराने केली जाईल.
८. २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्के घर देण्याचं आश्वासन.
९. २ वर्षात १५ नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे वचन.
१०. गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवणार.
११. शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा साखळी तयार करणार, ज्यामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील.