नवी दिल्ली – राजस्थानच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्याविषयीही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटकाँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नेत्या रिता बहुगुणा जोशी यांनी त्यांच्याशी बोलणं केल्याचं दावा केला होता. मात्र आता या चर्चेवर खुद्द सचिन पायलट यांनी भाष्य केले आहे.
याबाबत सचिन पायलट यांनी सांगितले की, भाजपामधील कोणासोबतही माझं बोलणं झालं नाही. रिता बहुगुणा जोशी यांनीही मला कॉल केला नाही. त्या सचिनशी फोनवर बोलल्या आहेत. मग तो सचिन तेंडुलकर असावा. माझ्याशी बोलण्याची त्यांची हिंमत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे. आज संध्याकाळी ४ च्या सुमारास सचिन पायलट दिल्लीत पोहचतील. दिल्लीत भाजपा यूपीसाठी प्लॅन बनवत असताना काँग्रेसमध्ये राजस्थानच्या राजकीय हालचालींवर चर्चा होणार आहे.
सचिन पायलट हे दिल्लीत पोहचून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीची वेळ ठरली नाही. तर दुसरीकडे पायलट यांच्या दिल्ली वारीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यांनी मंत्री आणि आमदारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या प्रत्येक हालचालींबाबत डिटेल्स देण्याचं काम त्यांनी विश्वासू शिलेदारांवर सोपवलं आहे. सचिन पायलट यांच्या घरी ८ आमदारांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.
माजी काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण पेटू लागलं आहे. राजस्थानच्या काँग्रेसवरही याचा परिणाम पाहायला मिळालं आहे. जवळपास १० महिन्यानंतर पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी जाहीरपणे पक्षाच्या नेतृत्वासमोर नाराजी उघड केली आहे. काँग्रेसच्या ३ सदस्यीय कमिटीचा अद्याप रिपोर्ट आला नाही. १० महिने झाले तरी मला दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झाला नाही. सरकारला अडीच वर्ष झाली तरी वाद शमताना दिसत नाही
काय म्हणाल्या होत्या रिता बहुगुणा जोशी?
'पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,' असं रिटा म्हणाल्या होत्या. काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा असल्याचं त्या पुढे म्हणाल्या. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत असं त्यांनी सांगितले होते.