- सुधीर लंकेअहमदनगर : नगर मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारात सहभागी न झालेले विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे शिर्डी मतदारसंघातही प्रचारात सक्रिय नाहीत. शिर्डीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे गुरुवारी दुपारी जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी श्रीरामपूर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतली.नगर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा अशी मागणी विखे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र, राष्टÑवादीने नकार दिल्यानंतर पुत्र सुजय यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. राष्टÑवादीमुळे सुजय यांच्यावर पक्षांतराची वेळ आली अशी नाराजी नोंदवत नगरला आघाडीचा प्रचार न करण्याचे धोरण राधाकृष्ण विखे यांनी घेतले होते. भाजपच्या बैठकांना उपस्थिती दर्शवून त्यांनी मुलाचा प्रचार केला. याबाबत राष्टÑवादीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली आहे.आता २९ तारखेला शिर्डी मतदारसंघाची निवडणूक आहे. ती जागा कॉंग्रेसच्या कोट्यात असून तेथे भाऊसाहेब कांबळे हे कॉंग्रेसची उमेदवारी करत आहेत. कांबळे हे श्रीरामपूरचे विद्यमान आमदार असून विखे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, ते आता कांबळे यांच्या प्रचारात दिसत नाहीत. सुजय यांनी मातोश्रीवर शिवसेनेला मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे राधाकृष्णही तेच धोरण घेतील असे बोलले जाते.हायकमांडकडे निर्णय प्रलंबितऔरंगाबादला अब्दुल सत्तार यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. विखे यांच्याबाबतही पक्षाकडे तक्रार झाली आहे. राष्टÑवादीनेच ही तक्रार केली आहे. मात्र, कॉंग्रेस हायकमांडने याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. राष्टÑवादीची तक्रार दिल्लीकडे पाठवली असून हायकमांड निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले आहे.राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार का?शुक्रवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर येथे सभा आहे. अध्यक्ष येत असताना पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे तेथे उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता आहे.
शिर्डीत कॉँग्रेसविरोधातच विखेंचे बंड; प्रचारात तटस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 5:31 AM