नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यावरुन शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यात संसद परिसरातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. कृषी कायद्याविरोधात हरसिमरत कौर बादल संसद परिसरात विरोध करत होत्या, त्यावेळेस खासदार रवनीत सिंह बिट्टू तिथे आले आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
काय म्हणाले रवनीती सिंह बिट्टू ?यावेळी रवनीती सिंह बिट्टू यांनी हरसिमरत कौर बादल यांच्या प्रदर्शनला ड्रामा म्हटले. तसेच, जेव्हा हे तिन्ही कायदे पास झाले, तेव्हा या कॅबिनेटमध्ये बसल्या होत्या, एकही शब्द बोलल्या नाही आणि आता फक्त ड्रामा करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, कायदा पास झाला तेव्हा यांनी विरोध का केला नाही, सरकारविरोधात काहीच का बोलल्या नाही ? असा सवालही केला.
हरसिमरत कौर बादल काय म्हणाल्या ?दरम्यान, हरसिमरत कौर बादल यांनी हे कायदे पास करण्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. हे कायदे पास होत होते, तेव्हा काँग्रेस कुठं होती. संसदेतून वॉक आउट करुन निघून गेले आणि भाजपाची मदत केली, असे त्या म्हणाल्या.
6 महिन्यांपासून सुरू हे आंदोलनकेंद्र सरकारने कृषी कायदे पास करुन घेतल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या गाजीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्याविरोधात यापूर्वी एकदा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च काढला होता. आता 15 ऑगस्टदिवशी पुन्हा शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत.