शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:58 AM2019-03-16T06:58:39+5:302019-03-16T06:59:09+5:30

राष्ट्रवादीतर्फे अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर : कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

In the Shirur constituency, there will be a lively fight | शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत

शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत

Next

- सचिन कांकरिया

नारायणगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे शुक्रवारी दुसरी यादी प्रसिद्ध केली असून, यात शिरूर मतदारसंघातून प्रसिद्ध सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शिवसेनेकडून चौकार मारण्यास उत्सुक असलेले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व डॉ. अमोल कोल्हे अशी लढत लक्षवेधी व अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कोल्हे यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांच्या मित्रमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

डॉ. कोल्हे यांची नारायणगाव ही जन्मभूमी आहे. त्यांचे आठवीपर्यंत शिक्षण येथेच झाले. पुढील उच्च शिक्षण पुणे येथील आपटे हायस्कूल या शाळेत झाले. नंतर एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांचे वडील रामसिंग कोल्हे हे पाटबंधारे विभागात अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर नारायणगाव येथील वडिलोपार्जित शेती करत असताना प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे नारायणगाव येथे निधन झाले. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हे हे प्रकाशझोतात येऊन तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत झाले. सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या संभाजीमहाराजांच्या भूमिकेमुळे सध्या ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. शिवसेनेचे स्टार प्रचारक व उपनेते म्हणून सहा ते सात वर्षे कार्य केल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी याच महिन्यातच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निचित मानली जात होती. राष्ट्रवादी तर्फे जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने जुन्नर तालुक्यात जल्लोष केला.

शिवसेनेतर्फे शिवाजीराव आढळराव-पाटील यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला प्रबळ उमेदवार मिळाला नसल्याने खासदार आढळराव पाटील यांनी या तीनही निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळविला. उमेदवाराची शोधाशोध सुरू होती. तगडा उमेदवार न मिळाल्याने सन २००९ मध्ये लोकसभेसाठी उभे राहिलेले माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना पुन्हा यंदाची निवडणूक लढविण्यास तयार केले केल्याने लांडे यांनी तयारी करून आढळरावांच्या विरोधात फ्लेक्सबाजीने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सन २००९ नंतर थेट लांडे आल्याने आढळराव-पाटील यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी व सोईची वाटत होती. परंतु ऐनवेळी शिवसेनेतील स्टार प्रचारक असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षात घेऊन गेल्या १५ दिवसांत शिरूर मतदारसंघात सहा सभांद्वारे डॉ. कोल्हे यांच्या अप्रत्यक्षरीत्या प्रचाराला सुरुवात केली.

निवडणूक ठरणार लक्षवेधी
मंचर व न्हावरे येथील सभांमध्ये डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीबद्दल कार्यकर्त्यांची चाचपणी केली असता, सर्वाधिक पाठिंबा डॉ. कोल्हे यांनाच मिळाला आहे. यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. शुक्रवारी (दि. १५) त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने खासदार आढळराव पाटील विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत असल्याने या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
बैलगाडी शर्यती, बाह्यवळणाचा प्रश्न, रेल्वे प्रकल्पाच्या फक्त घोषणा, विमानतळाला विरोध या प्रमुख बाबी खासदार आढळराव पाटील यांना अडचणीच्या ठरणार असल्याने तसेच जुन्नर तालुक्यातील आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे जि. प. गटनेत्या यांचा विरोध हेदेखील आढळराव पाटील यांना आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत या वेळी लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title: In the Shirur constituency, there will be a lively fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.