अहमदनगर - दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यामध्ये भर पावसात केलेले भाषण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अविस्मरणीय ठरले होते. दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2021) कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधित केले. रोहित पवार यांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली. ( Rohit Pawar gave a speech in rain, the audience remembered Sharad Pawar)
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार रोहित पवार आज जामखेडमध्ये आले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र रोहित पवार यांनी आपले संबोधन सुरू ठेवले. ते म्हणाले की, आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भर पवसात एका सभेला संबोधित केले होते. त्या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती झाली होती. तसेच साताऱ्यातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. तसेच विधानसभेतही राष्ट्रवादील ५४ जागा मिळाल्या होत्या. अखेर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते.