मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. कंगनानं मुंबईत येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांच्यावर लावला होता. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे संजय राऊत यांनीही कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. इतकचं नाही तर हरामखोर हा शब्दप्रयोग केल्यामुळे संजय राऊत यांच्यावरही टीका झाली.
एकंदर कंगना राणौत हिने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्याविरोधात ट्विटवरुन शाब्दिक रान उठवले. मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर हातोडा मारत बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले. कंगना राणौत हिच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमकपणे आंदोलन करुन तिला जोडेमारो आंदोलन केले होते. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिली होती.
या संपूर्ण वादानंतर कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा असं आव्हान दिल्याने शिवसैनिक चांगलेच खवळले होते. कंगना मुंबईत येण्यापूर्वी पालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने कंगनाच्या कार्यालयाला नोटीस बजावत २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. २४ तासानंतर मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझरने कारवाई केली. कंगना मुंबईत येत असल्याने तिच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षाही दिली. यावरुन सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष भाजपावर निशाणा साधला होता.
कंगनाच्या सुरक्षेसाठी रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळाबाहेर जमले होते. कंगना मुंबईत आल्यानंतर काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. परंतु शिवसेना नेतृत्वाने कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई योग्य असल्याचं सांगत कोणीही या विषयावर बोलू नये असा आदेश दिला. इतकचं नव्हे तर कंगनाविरोधात मुंबई विमानतळावर आंदोलन करु नका, कारण त्याची सहानुभुती कंगनाला मिळेल असंही शिवसैनिकांना सांगण्यात आलं. यानंतरही विमानतळावरील शिवसेनेच्या कामगार युनियनच्या काही सदस्यांनी विमानतळावर भाजपा आणि कंगनाविरोधात घोषणाबाजी केली. या घडलेल्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.
शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यावर कारवाई
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने येथे ‘मणिकर्णिका फिल्म्स प्रा. लि.’ नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस ती वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून तिने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.
कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी तिला ‘काम थांबविण्याची’ नोटीस मंगळवारी सकाळी बजावण्यात आली. तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. त्या वेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याचे कारण देत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाच्या ४० कर्मचारी-अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात तळमजला, पहिला मजला आणि कार्यालयाबाहेरील वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले.
कंगनाच्या बंगल्यावर कारवाई केल्यानं शरद पवारांची नाराजी
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रणौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही विधान केले अथवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. कारण मुंबई पोलिसांची कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे. प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा थोडे तारतम्य बाळगून, अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली पाहिजे. शहाण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये असंही शरद पवार म्हणाले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“शिवसेना मंत्र्यांचं मुंबईमधील कार्यालय अनधिकृत; १ वर्षापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई नाही”
कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव?
बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर
“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं
विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल