वाशिम - भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान आज जोरदार राडा झाला. भ्रष्टाचाराचा आरोप करून कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. तसेच सोमय्या यांच्या कारवर काळी शाई फेकण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. (Shiv Sainiks hurled stones at Kirit Somaiya's convoy and threw ink on the car)
किरीट सोमय्या हे घोटाळ्या प्रकरणी पाहणी करण्यासाठी वाशिम दौऱ्यावर आले होते. ते देगाव येथे जात असताना शिवसैनिकांनी त्यांचया वाहनावर शाई फेकली. तसेच दगडफेकही करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्यात आला. किरीट साेमय्या रिसाेड रस्त्याचे, पुलाचे अर्धवट असलेले काम व पार्टीकल बाेर्डची पाहणी करण्यासाठी देगाव येथे २० ऑगस्ट राेजी ११.३० वाजताच्या दरम्यान गेले हाेते. यावेळी संतप्त जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक व शाई फेकल्याने कामाची पाहणी न करताच ते तेथून निघुन आले. नंतर यासंदर्भात तक्रार देण्याकरिता ते रिसाेड पाेलीस स्टेशनमध्ये गेले. राज्यात सत्तेवर असलेले ठाकरे सरकार हे डाकू सरकार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शाईफेक आणि दगडफेक करणारे शिवसैनिक हे खासदार भावना गवळी यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.
खा. भावना गवळी यांच्या संस्थेमधील भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषदेसाठी किरीट साेमय्या जिल्हयात आले आहेत. तत्पूर्वी रिसाेड येथील काम, व पार्टीकल बाेर्डाची पाहणी करण्यासाठी जाण्याच्या नियाेजनानुसार देगाव येथे गेले असता नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक व शाईफेक केली. ही दगडफेक शिवसैनिकांनी केल्याचे बाेलल्या जात असले तरी यासंदर्भात खा. भावना गवळी यांनी ते शिवसैनिक नव्हे तर ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला ते शेतकरी असल्याचे सांगितले. यावेळी देगाव येथे माेठया प्रमाणात गर्दी असल्याने कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. दगडफेक घटना घडल्यानंतर किरीट साेमय्या यांनी रिसाेड पाेलीस स्टेशन गाठले. वृत्त लिहिस्ताेवर काेणत्याच प्रकारची तक्रार दाखल झाली नव्हती. यावेळी त्यांच्यासाेबत आमदार राजेंद्र पाटणी, राजु पाटील राजे, हरिष सारडासह ईतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित हाेते.