लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चौकशीसाठी जातील, तेव्हा सक्तवसुली संचालनालय अर्थात, ईडी कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शनाचा शिवसेनेच्या हालचाली सुरू होत्या. याबाबत तूर्त अशा प्रदर्शनाची गरज नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, असे स्वतः संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
वर्षा राऊत ५ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे. याच वेळी शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा होत्या. मात्र, त्यावर राणे यांनी तिखट शब्दात शिवसेनेवर हल्लाही चढविला होता. ‘शिवसेना ईडी ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही, हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही, हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी, म्हणून निघाला नाही, पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा,’ असे सांगत हाच का महाराष्ट्र धर्म? असा प्रश्न नितेश राणे यांनी समाजमाध्यमाद्वारे केला होता.
मोर्चाच्या बातमीवर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सायंकाळी आपली भूमिका समाजमाध्यमांवर मांडली. निदर्शनाच्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे, तेव्हा उतरू, पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? असे सांगतानाच, शिवसेनेची शक्ती पाठीशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.