शिवसेनेचा 'जय बांगला'चा धाडसी नारा, पण जनतेच्या मनातील 'त्या' रागावर काय उतारा? 

By यदू जोशी | Published: January 18, 2021 11:44 AM2021-01-18T11:44:36+5:302021-01-18T11:52:24+5:30

West Bengal Election, Shiv Sena: बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतरही पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात शिवसेना निवडणूक का लढवत आहे असा प्रश्न उपस्थित होतो.

Shiv Sena Announced to contest in West Bengal Election after Bihar, Know about Political Situation | शिवसेनेचा 'जय बांगला'चा धाडसी नारा, पण जनतेच्या मनातील 'त्या' रागावर काय उतारा? 

शिवसेनेचा 'जय बांगला'चा धाडसी नारा, पण जनतेच्या मनातील 'त्या' रागावर काय उतारा? 

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा निर्णय अनाकलनीय आहे.पश्चिम बंगालमध्ये सामान्य माणसांत आपल्या माणसांना विरोध करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे.महाराष्ट्रात सत्ता मिळवणारी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न पाहत आहे

यदु जोशी 

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेने भाजपावर मात केली आणि राज्यात मुख्यमंत्रिपद पटकावलं. अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने घरोबा केला. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता शिवसेनेने मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ४० उमेदवार उभे केले होते. यात जवळपास सर्वच जागांवर शिवसेना उमेदवारांना सपाटून मार खावा लागला, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. इतकं असूनही शिवसेनेने आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचे कोणतेही नेटवर्क नाही, शाखा नाही, काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, परंतु राज्याच्या राजकारणावर शिवसेनेचा कोणताही प्रभाव नाही, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला प्रतिनिधित्व नाही. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि भाजपा या ४ पक्षांचा बोलबाला आहे. तर बिहारमध्ये ५ जागा जिंकून MIM ची नोंद घेण्यास भाग पाडणारे असदुद्दीन औवेसी पश्चिम बंगालमध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार आहेत. 

हिंदुत्ववादी शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कितपत प्रभाव जाणवेल याबाबत 'लोकमत डॉट कॉम'ने हिंदुस्तान टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्याशी चर्चा केली. प्रदीप मैत्र हे मूळचे बंगाली आहे, बंगालचं राजकारण, समाजकारण, साहित्य या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा निर्णय अनाकलनीय आहे. बिहारसारखी गत शिवसेनेची पश्चिम बंगालमध्ये होईल असं सध्याचं चित्र आहे. तरीही शिवसेनेचा निर्णय धाडसाचा म्हटला पाहिजे. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शिवसेनेने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत अनेकदा बांगलादेशी घुसखोर हाकला, अशी मागणी करत शिवसेनेने आक्रमक आंदोलन केली आहेत. ही पार्श्वभूमी पाहता पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेविरुद्ध राग, आकस आहे, याकडे मैत्र यांनी लक्ष वेधलं. पश्चिम बंगालमध्ये असो वा बांगलादेशातून जी माणसं छळाला कंटाळून मुंबईत गेली आहेत, त्यात फक्त मुस्लीम नव्हे तर हिंदूंचादेखील समावेश आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सामान्य माणसांत आपल्या माणसांना विरोध करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. यामुळे शिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये स्थानिक नागरिक स्वीकारतील असं वाटत नाही, असं मत त्यांनी मांडलं.

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे एनडीएच्या उमेदवाराऐवजी यूपीएच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यानंतर, प्रणवदांनी 'मातोश्री'वर येऊन बाळासाहेबांची भेटही घेतली होती. या एका प्रसंगाशिवाय, शिवसेना आणि पश्चिम बंगाल यांचं तसं काहीच नातं नाही.  

शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न 

बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतरही पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात शिवसेना निवडणूक का लढवत आहे असा प्रश्न उपस्थित होतो, त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रात सत्ता मिळवणारी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न पाहत आहे. पक्षाची कक्षा ओलांडावी असं नेतृत्वाला वाटू लागले आहे. संजय राऊत यांनी मध्यंतरी विधान केले होते, उद्धव ठाकरेंना देशाचे पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्रात १५-२० खासदार निवडून आणून राष्ट्रीय राजकारणात छाप पडणार नाही. तर बाहेरच्या राज्यातही कुठे ना कुठे अस्तित्व दाखवावं लागेल असं शिवसेनेला वाटत आहे. परंतु. राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे स्वप्न आणि सध्याची वस्तुस्थिती यात विसंगती आहे. कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे नेटवर्क लागते ते शिवसेनेकडे नाही. राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची इच्छा आणि इतर राज्यात जनाधार नसणे हे वास्तव अशा स्थितीत शिवसेनेची नौका महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात हेलकावे खात राहील, असंच आत्तातरी म्हणावं लागेल.

Web Title: Shiv Sena Announced to contest in West Bengal Election after Bihar, Know about Political Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.