लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : युती तुटल्यानंतरच्या काळातील शिवसेना आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांचीच चुणूक बुधवारी शिवसेना भवनासमोरील राड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येईल तशी ही राजकीय खुन्नस वाढत जाईल. त्या दृष्टिकोनातून पाहता ही घटना येत्या काळातील शिवसेना विरुद्ध भाजप संघर्षाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना भवन परिसरात जोरदार राडा; राम मंदिर जमीन गैरव्यवहारावरून शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. तेव्हापासून मुंबईत दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी एकमेकांना भिडत आहेत. मागच्या पालिका निवडणुकीत जो प्रश्न अनिर्णीत राहिला, त्याचा निकाल या निवडणुकीत लावण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते सज्ज झाले आहेत. स्थानिक पातळीवरचे नेतेही एकमेकांना खुन्नस देऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यातूनच हा राडा झाल्याचे चित्र आहे. भाजयुमोचे आंदोलक आंदोलन करून गेले आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची राजकीय खुन्नस समोर आली.
मागील पालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मुंबईत भाजप ही शिवसेनेला तुल्यबळ असल्याचे दाखवून दिले. आगामी पालिका निवडणुकीत आपलीच सरशी व्हावी, यासाठी शिवसेना राज्यातील सत्तेचा खुबीने वापर करत राजकीय मांडणी करत आहे; त्याच वेळी भाजप नेत्यांनीही मागची कसर भरून काढण्यास कंबर कसली आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पालिका निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्थानिक पातळीवर राजकीय स्पर्धा, संघर्षाचे रूपांतर राड्यातच होत राहणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.