मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिक भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यातील दुरावा कमी झाला असून पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. त्यातच राज्यात भेटीगाठीच्या बातम्यांनी या चर्चेला आणखी वाव मिळाला.
भाजपा नेते आशिष शेलार(Ashish Shelar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची भेट झाली अशी बातमी शनिवारी माध्यमांमध्ये पसरली. या बातमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं की, माझी कोणासोबतही भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात असा खुलासा त्यांनी केला आहे.
त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अफवेमुळे राजकारण हलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत असा टोला संजय राऊतांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.
दरम्यान, अफवा पसरवल्यामुळे राजकारण अस्थिर होत नाही. अफवा पसरवणारे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील. विधानसभा अध्यक्षपदाबाबत जे मुख्यमंत्री बोलतील तेच आमचं मत आहे. राज्याच्या हिताचे अनेक मुद्दे आहेत त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. विरोधकांनी पूर्णवेळ कामकाज चालू दिलं पाहिजे. विरोधकांना महाराष्ट्राची काळजी असेल. ते स्वत:ला महाराष्ट्राचे समजत असतील तर त्यांनी कामकाज सुरळीत पार पाडायला हवं. २ दिवसीय अधिवेशन गोंधळात वाहू देऊ नये ही जनतेची इच्छा आहे. लसीकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर चर्चा करा असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
काय आहे दावा?
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.