मुंबईशिवसेना पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरा देखील करणार आहेत.
शिवसेनेनं याआधीच पश्चिम बंगालमध्ये १०० जागांवर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला नव्हता. अखेर आज संजय राऊत यांनी शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. शिवसेना आता नेमक्या किती जागांवर उमेदवार देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, भाजप, डावे पक्ष, काँग्रेस आणि एमआयएम पक्ष देखील रिंगणात आहे. त्यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे.
उद्धव ठाकरेही दौरा करण्याची शक्यतापश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतल्याने याचा भाजपला फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे.