काँग्रेसला वगळून यूपीए अशक्य; NDA तून बाहेर पडलेली शिवसेना UPA मध्ये जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:08 AM2021-12-07T07:08:01+5:302021-12-07T07:08:29+5:30
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, काँग्रेसला वगळून भाजपच्या विरोधात कोणतीही आघाडी सक्षम राहू शकणार नाही.
नवी दिल्ली : काँग्रेसला बाजूला करून भाजपच्या विरोधात विरोधकांना लढता येणार नाही. यासाठी यूपीए मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत मुंबईत चर्चा झाली आहे. पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. काँग्रेसला वगळून भाजपच्या विरोधात कोणतीही आघाडी सक्षम राहू शकणार नाही. यूपीएमध्ये आणखी पक्षांना सोबत आणण्यावर चर्चा करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर यूपीएच्या कोणाचाही आक्षेप नाही. यूपीए मजबूत होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करून खासदार राऊत म्हणाले, नेतृत्वाचा प्रश्न नंतर येतो. त्यावर नंतर विचार करता येईल. पहिल्यांदा यूपीएमध्ये अधिक पक्ष सामावून घेण्याची आवश्यकता आहे. याबद्दल चर्चा सुरू राहणार आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी ही भाजपला मदत करणारी ठरेल.
शिवसेना यूपीएत?
शिवसेना पक्ष अनेक वर्षे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये होता. परंतु दोन वर्षांपूर्वी सेना एनडीएतून बाहेर पडली. अद्यापही शिवसेनेने यूपीएत अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. परंतु संजय राऊत यांची अलीकडील वक्तव्ये ही शिवसेना यूपीएच्या जवळ जात असल्याचे इशारे देणारी आहेत.