काँग्रेसचा ‘डबल’ धमाका, शिवसेनेला जोरदार धक्का; माजी मंत्र्याचा थेट दिल्लीत होणार पक्षप्रवेश
By प्रविण मरगळे | Published: July 13, 2021 06:15 PM2021-07-13T18:15:27+5:302021-07-13T18:19:42+5:30
शिवसेनेच्या दोन नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून लवकरच त्याबाबत अधिकृत तारीख निश्चित केली जाणार आहे.
प्रविण मरगळे
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर अलीकडेच नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनं शिवसेनेला(Shivsena) ‘डबल’ धमाका देण्याचं ठरवलं आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.
कोण आहेत अशोक शिंदे?
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून अशोक शिंदे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचसोबत युती सरकारच्या काळात अशोक शिंदे(Ashok Shinde) यांच्याकडे उद्योग राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. १९९५ मध्ये पहिल्यांदा अशोक शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विदर्भातील वर्धा जिल्ह्यात निवडून आले होते. मागील काही दिवसांपासून पक्ष संघटनेतील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत त्यांचे वाद होते. या प्रकरणी पक्षनेतृत्वाकडे न्याय मागूनही मिळाला नाही त्यामुळे अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर गेले आहेत.
कोण आहे सुरेश म्हात्रे?
ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जातात. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर. पण कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही, अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. अशोक शिंदे आणि सुरेश म्हात्रे या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश दिल्लीत दणक्यात करणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत तारीख निश्चित केली नाही.