नागपूर : शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते नागपूर येथे एक दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते.
शिवसेनेने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून ते हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे असे घडल्याचा आरोप त्यांनी केला. महापुरुषांच्या जयंत्या आपण सणासारख्या साजऱ्या केल्या पाहिजे. त्यामुळे सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुकीकरिता परवानगी दिली पाहिजे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या कामकाजावर नागरिक नाखुश आहेत. आरोग्य सेवक, शिक्षक, तरुण यांच्यासह सारेच आपले वेगवेगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत, असे मत व्यक्त करून ठाकरे म्हणाले, "माझ्यावर पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे, ती योग्यरित्या पार पाडण्यासाठी आधी पक्ष बांधणी करण्याचे ठरवले आहे. मी इतर पक्ष काय करतात, याचा विचार करीत नाही. मला माझा पक्ष वाढविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार मी करतो."
याचबरोबर, आपण नागरिकांचे मुळ प्रश्न अद्याप सोडवू शकलो नाही. त्यामुळे आधी आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मिळाली पाहिजे, असे मतही अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी उपस्थित होते.