पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यात महत्वाची भूमिका निभावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत व भाजप यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्हीही बाजूने सोडली जात नाही. परंतु राऊत यांना त्रास जाणवू लागल्याने नुकतेच ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांच्यावर ऍन्जोप्लास्टी करण्यात येणार आहे. भाजपकडून राऊत हे लवकरात लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या गेल्या आहेत.
भाजप व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यांच्या प्रकृतीवर भाष्य केले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते. उपाध्ये म्हणाले, संजय राऊत हे उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मात्र एकीकडे राऊत यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
उपाध्ये म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणतेही धोरण नाही. तसेच त्यांना काम करण्याची इच्छा नाही. आघाडीमधील शिवसेना ,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षात समन्वय नाही. पण आलं अंगावर तर ढकल केंद्रावर आणि आलं अंगावर तर ढकल भाजपावर ही या ठाकरे सरकारची व त्यामधील सहभागी पक्षांच्या नेत्यांची मानसिकता आहे.
आघाडी सरकारमधील एक मंत्री एक भूमिका मांडतात. दुसरे भलतेच काहीतरी बोलतात. ना एकमत ना धोरण अशी अवस्था राज्य सरकारची आहे. संजय राऊत यांचीही तीच भूमिका आहे. आपल्या अपयशाचे खापर ते कायम कधी भाजप तर कधी केंद्र सरकारवर फोडत असतात असाही निशाणा उपाध्ये यांनी साधला.