गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनला काँग्रेसनं विरोध केला आहे. परंतु यावरून शिवसेनेचे नेते राऊत यांनी आज काँग्रेसला टोला लगावला. काँग्रेसचा काय विरोध आहे हे माहिती नाही. इतर विषयांप्रमाणे हादेखील त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो, असं म्हणत संजय राऊत यांनी लॉकडाऊनवरून काँग्रेसला टोला लगावला."काँग्रेसचा काय विरोध आहे हे माहिती नाही. इतर विषयांप्रमाणे हादेखील त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो. पण लॉकडाऊन व्हावं किंवा नाही हा राष्ट्रीय प्रश्न आहे. याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. मुख्यमंत्री फार आनंदानं अशा प्रकारचे निर्णय घेतात असं नाही. काही आपात्कालिन परिस्थितीनुसार असे निर्णय मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना घ्यावे लागतात," असं राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. केंद्रानं मदत करणं आवश्यककेंद्र सरकारनं सर्व राज्यांना मदत करणं गरजेचं आहे. विशेषत: महाराष्ट्राला मदत करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल. पण फक्त महाराष्ट्रात भाजपचं राज्य नाही म्हणून त्यांची कोंडी करायची हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडतायत. त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे चाचण्या मोठ्या प्रमामात होतायत. इतर राज्यात तसं नाही. महाराष्ट्राचं कौतुक करायला हवं. यातून महाराष्ट्र लवकर बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "प्रत्येकाचं काही वैयक्तिक मत असू शकतं. परंतु एक राज्य आणि एक देश म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना काही निर्णय घेणं बंधनकारक असतं. ते राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी असतं," असंही राऊत म्हणाले.
काँग्रेसचा काय विरोध हे माहित नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो; लॉकडाऊनवरून राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 1:20 PM
केंद्रान सर्व राज्यांना मदत करणं आवश्यक. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल राऊत यांचं वक्तव्य
ठळक मुद्देकेंद्रान सर्व राज्यांना मदत करणं आवश्यक : संजय राऊतमहाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल राऊत यांचं वक्तव्य