शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी "फेस टू फेस" या नव्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली. राजकीय व्यक्तींची अराजकीय मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाविकास आघाडीची स्थापना यावरही उत्तर दिलं.
"राज ठाकरे यांनी शिवसेनेची साथ सोडणं आणि राज्यात महाविकास आघाडीची स्थापना होणं हे महाराष्ट्राच्या तसंच शिवसेनेच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. राज ठाकरे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा जवळच्या घडामोडीतला मी एक साक्षीदार आहे. खुप गोष्टी मी पाहिल्या. त्या दिवशी मी त्यांच्या घरी होती. त्या दिवशी त्यांचे लोक माझी गाडी तोडत होते हेदेखील मी पाहिलं. मनोहर जोशीही निघून गेले. मी जर लिहायला गेलो तर खूप मोठे स्फोट होतील," असं संजय राऊत म्हणाले.
राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...
"महाविकास आघाडीच्या घटनाक्रमाबद्दल अनेकांनी लिहिलं. पण अनेकांनी लिहिलेल्या घटनाक्रमात काहीच अर्थ नाहीये. अनेकदा लोकं मला राजकारणावर लिहा, सिंहासन २ लिहा असं सांगतात. आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, आपण का लोकांना अडचणीत आणायचं?," असा सवालही त्यांनी केला. जे तुम्ही वाचता त्यात काही सत्य नाही. पडद्यामागे काही वेगळंच घडलं आहे, आज जे सत्तेत बसलेत त्यांनाही त्या पडद्यामागची पटकथा माहित नसल्याचं राऊत यांनी नमूद केलं.
"सामना हे माझं खरं घर आहे. माझं अख्ख आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले.