महाविकास आघाडीत धुसफूस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना नेत्यांची स्वबळाची मागणी

By प्रविण मरगळे | Published: February 9, 2021 10:41 AM2021-02-09T10:41:11+5:302021-02-09T10:42:56+5:30

Navi Mumbai Municipal Corporation Election: नवी मुंबईत महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे, नवी मुंबईत नाईक कुटुंबाने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता,

Shiv Sena leaders demand to CM Uddhav Thackeray for fight Seprate election from ncp-congress NMMC | महाविकास आघाडीत धुसफूस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना नेत्यांची स्वबळाची मागणी

महाविकास आघाडीत धुसफूस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना नेत्यांची स्वबळाची मागणी

Next
ठळक मुद्देजागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे.नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतलीमहापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत धुसफूस झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

नवी मुंबई –  विधान परिषदेच्या ५ जागांवर एकत्रित निवडणूक लढल्यानंतर महाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचं ठरवलं आहे. परंतु राज्य पातळीवर नेत्यांनी आघाडी करून लढण्याचे आदेश दिले तरीही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरूनही तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

याचाच प्रत्यय नवी मुंबई महापालिकेत पाहायला मिळत आहे, नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यातच जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत धुसफूस झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवी मुंबईत महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे, नवी मुंबईत नाईक कुटुंबाने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, त्यानंतर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असताना नाईक कुटुंबासोबत अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक नाईकांची साथ सोडून पुन्हा स्वगृही परतत असल्याचं दिसून येत आहे.

यातच महाविकास आघाडीत काँग्रेसने ३२ तर राष्ट्रवादीने ४० जागा मागितल्या आहेत, तर शिवसेना ७० जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार की वेगळी हे पाहणे गरजेचे आहे.

नवी मुंबईत महापालिकेत पक्षीय बलाबल (एकूण १११)

भाजपा – ५६

शिवसेना – ३८

राष्ट्रवादी – २

काँग्रेस – १०

इतर - ५

महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यासोबत मनसेनेही यंदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षापासून मनसेने नवी मुंबईत पक्षीय बांधणी केली आहे, यंदा पहिल्यांदाच ही महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला ५० हजारांपेक्षा जास्त मतदान शहरातील  २ मतदारसंघात झालं होतं, त्याचसोबत इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

Web Title: Shiv Sena leaders demand to CM Uddhav Thackeray for fight Seprate election from ncp-congress NMMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.