मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या कार्यालयातील अनाधिकृत बांधकामावर २४ तासांत तोडक कारवाई केल्यानंतर अनेकांनी महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंगनाच्या कार्यालयावर पालिकेने बुलडोझर फिरवला ही सुडबुद्धीने झालेली कारवाई आहे असा आरोप विरोधी पक्ष भाजपाने केला होता. जो न्याय कंगनाला दिला तशाच इतर अनाधिकृत बांधकामावर कारवाई करुन द्यावा असं भाजपाने म्हटलं होतं.
यानंतर आता भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्विट करुन शिवसेना मंत्री अनिल परब यांचे कार्यालयच बेकायदेशीरपणे बांधल्याचं उघड केले आहे. याबाबत त्यांनी म्हाडाने २०१९ मध्ये त्यांना बजावलेली नोटीस पोस्ट केली आहे. एक वर्षापूर्वी नोटीस बजावूनही अद्यात अनाधिकृत कार्यालय तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेची औकात बस एवढीच आहे. बेसुमार फैलावलेला कोरोना, मातोश्रीच्या शेजारी असलेल्या बांगलादेशींच्या ४ मजली झोपड्या ही आव्हान तुम्हाला झेपणार नाहीत. टक्केवारीवाल्या हातात तेवढे बळच नाही अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कंगनाच्या पाली हिल येथील मालमत्तेवर महापालिकेचा हातोडा
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने येथे ‘मणिकर्णिका फिल्म्स प्रा. लि.’ नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस ती वादग्रस्त टिष्ट्वटमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून तिने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी तिला ‘काम थांबविण्याची’ नोटीस मंगळवारी सकाळी बजावण्यात आली.
कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या नोटीसनुसार, तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. त्या वेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याचे कारण देत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाच्या ४० कर्मचारी - अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात पाडकामाला सुरुवात केली. तळमजला, पहिला मजला आणि कार्यालयाबाहेरील वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले.
ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
आशिष शेलारांनीही महापालिकेवर साधला निशाणा
मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तसेच, रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरात आणि कंगना राणौतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असेही सवाल आशिष शेलार यांनी पालिकेवर निशाणा साधला.