मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन पत्रकार अर्णब गोस्वामी वारंवार शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला टार्गेट करत आहेत. यावरुन आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहेत.
या निवेदनात अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, पत्रकार अर्णब गोस्वामी हे सतत बेजबाबदार बातम्या प्रसारित करत आहेत. कुठल्याही पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत त्यांच्या चॅनेलची मजल गेली आहे. बातम्या प्रसारित करताना यापूर्वीही त्यांनी राजकीय नेत्यांवर खास करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अश्लाध्य शब्दात आरोप करुन चारित्र्यहनन केले होते. त्यामुळे यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
तसेच एका मृत महिलेबाबत आरोप करताना पत्रकारितेतील सर्व नीतीमत्ता त्यांनी ओलांडली आहे. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहननाचे पातक त्यांच्याकडून घडले आहे. सदर महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला आहे. अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनक प्रसारित करुन अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी भीती खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
त्याचसोबत एखाद्या गुन्ह्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिद्ध करणे, त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणू शकतो. गुन्हेगाराला सुरक्षितस्थळी पळण्यासाठी मदत होते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलीस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एवढचं नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी भाषेत करुन धमकावले आहे. हे करतानाची त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक होती. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी आणि त्याच्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रातील जनता करत आहे. या प्रकरणी गृहखात्याने लक्ष घालून तातडीने त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली.